महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक यांना पदावरून हटवावे. या मागणीसाठी सर्वत्र महाराष्ट्रभर कला महाविद्यालयात शिक्षकांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यात शहरात सर्व अनुदानित व विनाअनुदानित कला महाविद्यालयांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनीं आज सहभाग नोंदविला आहे. यावेळी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे.
कलासंचालकांनी आतापर्यत एकदाही कला महाविद्यालयाच्या प्राचार्याची बैठक घेतलेली नाही. एकदाही कला महाविद्यालयाचे प्रश्न जाणून घेतलेले नाहीत. इतकेच नव्हे तर काही महाविद्यालयाचा अनुदानाची पध्दत देखील अद्यापही अर्धवट ठेवली आहे. याशिवाय अभ्यासक्रम बदलण्याचा प्रश्न देखील कायम आहे. इतकेच नव्हे तर कला महाविद्यालयाचे प्रश्न घेऊन प्राचार्य कला संचालकांकडे गेले तर ते जागेवर कधीच सापडत नाहीत. इतकेच नव्हे तर प्राचार्य त्यांना भेटले तर ते व्यवस्थित बोलत नाहीत. याच्या निषेधार्थ कला महाविद्यालयात काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना हटविण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात एकूण 206 कला महाविद्यालयात हे आंदोलन सुरू झाले असल्याचे राजा रविवर्मा चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य उदय भोईर यांनी सांगितले.